SAVE RANI BAGH BOTANICAL GARDEN FOUNDATION
प्रतीक पुरी
Feb 02, 2014, 09:02AM IST

मुंबईचं हिरवं फुप्फुस

धूळ आणि प्रदूषित हवा हे कोणत्याही विकसित शहराचं वास्तव असतं. शहरं जितकी विकसित, तितकीच ती प्रदूषित असतात. कारण विकास करताना निसर्गाशी असलेला माणसाचा अविभाज्य संबंध हा नेहमीच दुर्लक्षिला जातो. हा समतोल ढासळला, की त्याचे दुष्परिणाम माणसांनाच भोगावे लागतात. मुंबईकरही त्याला अपवाद नाहीत. पण याच मुंबईत श्वासांना स्वच्छ प्राणवायू देणारी, डोळ्यांत आनंद भरणारी आणि मेंदूला संशोधनाची आवड लावणारी एक विलक्षण जागा म्हणजे, भायखळा येथील ‘राणी बाग’ किंवा ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान.’ या बागेला 150 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या नैसर्गिक वारशाचा आढावा घेणारं एक सर्वांगसुंदर पुस्तक काढण्यात आलं, ‘राणी बाग’ या नावाचंच. मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं संपादन केलं जयप्रकाश सावंत यांनी. तर मूळ इंग्रजी पुस्तकाच्या संपादनाला हुतोक्षी रुस्तमफ्राम आणि शुभदा निखार्गे या निसर्गप्रेमी लोकांचा हातभार लागला आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातच भारतात काही महत्त्वाच्या ठिकाणी वनस्पती उद्यानांची स्थापना करण्यात आली होती. शिवाय प्रादेशिक शेती व फळबागा सोसायटींनीही काही उद्याने विकसित केली होती. भायखळा येथील आत्ताच्या उद्यानाची स्थापना शिवडी येथे 1842 मध्ये झाली होती. नंतर 1862 मध्ये त्याचं स्थानांतर भायखळा येथे करण्यात आलं आणि त्याचं ‘व्हिक्टोरिया गार्डन’ असं नामकरण करण्यात आलं. या उद्यानाला आता 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. 53 एकर परिसरातील विस्तार असलेली ही मुंबईतली सर्वांत मोठी हरित जागा आहे. इथल्या 100 बागांमध्ये 853 जातीचे 3213 वृक्ष आहेत. याशिवाय भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय, ससून टॉवर, प्राणीसंग्रहालय ही अन्य आकर्षणेही आहेत.

या पुस्तकाची रचना अतिशय श्रीमंत अशी आहे. राणीच्या बागेचा व तेथील वनस्पती सौंदर्याचा ठाव घेणारी 200 रंगीत छायाचित्रे, राणीच्या बागेचं महत्त्व सांगणारे अभ्यासू लेख आणि ही बाग वाचवण्यासाठी चालवण्यात आलेल्या यशस्वी लढ्याची माहिती यामुळे पुस्तकाचं वाचनमूल्य वाढलेलं आहे. बिट्टू सहगल यांचा राणीच्या बागेची महत्ता व आवश्यकता सांगणारा लेख, राणीच्या बागेचा इतिहास उलगडून दाखवणारा मरीअम डोसल यांचा लेख, आणि विकास दिलावरी यांनी निसर्ग आणि वास्तुकला यांचा मिलाप साधणारा वारसा, असं म्हणत येथील उद्यानांची अभिजात रचना आणि स्मारकांची सांगितलेली हकीकत याने पुस्तकाची सुरुवात होते. हे सर्व लेख मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. मार्सेलीन आलमेडा यांनी या वनस्पती उद्यानातील देशी आणि विदेशी वनस्पतींची ओळख करून दिली आहे. जोडीला आहेत त्यांची सुंदर छायाचित्रे. फिरोजा गोदरेज यांनी या उद्यानात घालवलेल्या आपल्या बालपणीच्या दिवसांना उजाळा दिला आहे. संपादक हुतोक्षी रुस्तमफ्राम आणि शुभदा निखार्गे यांनी या लोकोद्यानाच्या आवश्यकतेची साधकबाधक चर्चा केली आहे. तिच्या अस्तित्वासाठी भाऊ दाजी लाड, जगन्नाथ शंकरशेठ, जॉर्ज बर्डवूड, कावसजी जहांगीर, डेव्हीड ससून आदी लोकांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतली आहे. यांच्याच अन्य एका लेखात राणीबागेच्या नूतनीकरणाचा अप्रस्तुत आणि अव्यवहारी प्रकल्प रद्द करण्यासाठी त्यांनी अन्य काही निसर्गप्रेमींच्या सहकार्याने दिलेल्या संघर्षाची कथा सांगितली आहे. प्रत्येकाने ती वाचून आत्मसात करण्याची आज गरज आहे.

राणीची बाग ही ख-या अर्थाने वनस्पतीपीठ म्हणून ओळखली जाते. पर्यावरणाचा अभ्यास करणारे आणि त्याची आवश्यकता जाणणारे अशा दोन्हींच्या दृष्टीने या उद्यानाची महत्ता वादातीत आहे. ही केवळ करमणुकीसाठी काही वेळ फिरण्याची जागा नाही; तर आपला समृद्ध नैसर्गिक वारसा नष्ट होणार नाही, तिचे संवर्धन करणे ही केवळ चैन नाही तर ती आपल्या जगण्याची एक नितांत गरज आहे, याची जाणीव करून देण्याचं काम हे पुस्तक करतं. शहरांच्या वाढत्या सिमेंटीकरणात माणसांच्या भावनांवरही सिमेंट थापलं जातं, त्यांची संवेदनशीलता गंजत जाते. तिला धुमारे फोडण्याची ताकद या पुस्तकात आहे. नव्या पिढीची कुतूहलता आणि मागच्या पिढीने त्यांच्यासाठी काय जतन करून ठेवलं आहे, याची साक्षही या उद्यानात आल्यावर पटते. मुंबईचं हे हिरवं वैभव जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आणि केवळ मुंबईच नाही तर इतर अन्य शहरांतही जी हिरवाईची नवलाई आहे, ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे, याचं भानही या पुस्तकानं मिळतं. आणि त्यासाठी प्रसंगी लढा देण्याची गरज भासलीच तर त्यासाठी प्रेरणा देण्याचीही ताकद या पुस्तकात आहे. ‘वनस्पती उद्याने नागरिकांना निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी मदत करतात, अधिक शाश्वत जीवनपद्धती अंगीकारण्यासाठी प्रेरणा देतात, विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षणासाठी आवश्यक ते वातावरण उपलब्ध करून देतात, तर वनस्पती अभ्यासक आणि निसर्गप्रेमी नागरिकांसाठी जितीजागती संग्रहालये आणि निसर्ग निरीक्षणाचे शिकवणी वर्ग बनतात. शिवाय वारसा, परंपरा यादेखील आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असतात. त्यांच्या अध्ययनातूनच आपल्याला हे कळू शकतं, की विकसनशील जगात आपण ‘विकासा’ची प्रत्येक पायरीवर अधिकाधिक आततायी होत जाणारी जी संकल्पना राबवतोय, ती किती दुर्दैवी आहे.’ असं मत ‘सिंगापूर बॉटॅनिक गार्डन्स’चे संचालक डॉ. नायगेल टेलर यांनी या पुस्तकाच्या अभिप्रायात नोंदवलं आहे; जे सर्वांनी विचारात घेण्याजोगं आहे.

० राणी बाग 150 वर्षे

० संपादक : हुतोक्षी रुस्तमफ्राम, शुभदा निखार्गे

० प्रकाशक : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्स ऑफ द ट्रीज, सेव्ह राणी बाग बॉटनिकल गार्डन फाउंडेशन

० मूल्य : 1800 रुपये



Save Rani Bagh Botanical Garden Foundation
info@saveranibagh.org